Friday, 30 June 2017

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं


अकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर चक्क छोटं धरण बांधलं आहे. यामुळे इथली शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेने वारंवार खोडा घालून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण तिडकेंनी आपले भागिरथ प्रयत्न थांबले नाहीत.

इथलं शिवार जलयुक्त करण्याची जिद्द, दुष्काळाला हरवण्याची जिद्द, सगळीकडे हिरवळ निर्माण करण्याची जिद्द आणि संजय तिडके यांच्या याच जिद्दीतून हा बंधारा उभा राहिला आहे.

सांगवी दुर्गवाडाच्या संजय यांची 80 एकर जमीन. दरवर्षीच्या पावसात पीक आणि माती वाहून जायची. तर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा. यावर कायमचा पर्याय म्हणून शिरपूर पॅटर्नचा बंधारा बांधण्याचा निर्णय झाला. आसपासच्या शेतकऱ्यांनीही साथ दिली. काम सुरुही झालं. मात्र अवैध वाळू उपसा करण्याचं कारण देत प्रशासनाने कामात खोडा घातला.

दरवर्षीचा प्रश्न सोडवण्यासाठी बंधाऱ्याचं काम सुरु केलं. मात्र अवैध वाळू उपसा करता असं सांगत प्रशासनाने काम थांबण्याचा इशारा दिला. माझ्याकडे रॉयल्टी आहे तरी हा खोडा, असं संजय तिडके म्हणाले.
प्रशासनाच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी साथ सोडली, काम थांबलं. मात्र अशातही ध्येयवेड्या संजय यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वत:ची दहा एकर जमीन विकली. पैसा उभा केला आणि थांबलेलं काम पुन्हा सुरु झालं.
सध्या 18 फूट उंच आणि 260 फूट लांब भिंतीचं काम पूर्ण झालं आहे. खोलीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी आतापर्यंत 20 लाख खर्च झाले आहेत.

सगळ्यांनी साथ सोडली तरी यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे. सर्वांनी फुकट पाणी घ्या. पण आता मला माहित आहे की या कामावर सरकार आयत्या पिठावर रेषोट्या ओढायला येईल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय तिडके यांनी दिली.

शेयर करा

No comments:

Post a Comment

Popular Posts