Monday, 17 April 2017

Guide book of life - पुस्तक म्हणजे आयुष्य मार्गदर्शक

पुस्तक म्हणजे आयुष्य मार्गदर्शक
------------------------------------------

एका पुस्तकात आयुष्य बदलून टाकण्याची ताकद असते. एक पुस्तक विचार सामर्थ्यात विशेष भर घालणारे, उज्वल भवितव्य घडविणारे असते. अनेक जणांचा शाळा-महाविद्यालयाच्या अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकांशी तसा थेट संपर्क येताना दिसत नाही, अशा मंडळींची संख्या जगात मोठ्या प्रमाणात आहे; परंतु पुस्तकावर प्रेम करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही.
मराठीत निर्माण होणाऱ्या साहित्याची व्याप्ती शहरी भागातील मध्यमवर्गीयांपुरतीचं मर्यादित राहून खेड्यांतील जनता मात्र यापासून वंचित राहत आहे. आज तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले युवक मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, आयपॅडच्या दुनियेमुळे वास्तवापासून दूर जात आहेत. याच  तंत्रज्ञानाचा वापर करून पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीशी, आपल्या नात्यांशी, जगाशी एक घट्ट नाते तयार करण्याचे काम नवी अर्थक्रांती करणार आहे.
जगात ज्ञान, माहिती, मनोरंजन तसेच प्रबोधनाचे काम पुस्तकांद्वारे होते. मराठीतील ययाती, मृत्युंजय, श्यामची आई, व्यक्ति आणि वल्ली, छावा, स्वातंत्र्यवीर, अमृतवेल अशा अनेक उत्तम व एकापेक्षा एक सरस पुस्तकांच्या प्रत्येक पानातून ज्ञानगंगा सळसळून वाहत आहे.
काल 'शेकडो ऑडिओ पुस्तके अगदी अल्प किंमतीत नवी अर्थक्रांती ज्ञानपिपासूंसाठी घेऊन येत आहे' असे जाहीर केल्यावर आपण या कल्पनेचे जोरदार स्वागत केले आणि महाराष्ट्र ही ज्ञानगंगा श्रवण करण्यासाठी किती आसुसलेला आहे याची प्रचिती आली. पुस्तकातील एका गोष्टीने जीवन सामान्य ते असामान्य होऊन जाते. महात्मा गांधीजींच्या जीवनात हरिश्चंद्र-तारामतीच्या कथेने सत्याचा प्रयोग सुरू झाला, तर स्वामी विवेकानंदाच्या जीवनात वर्डस्वर्थ नावाच्या इंग्रज कवीच्या कवितेने जीवन परिवर्तनाची दिशा दाखविली. आपल्या आयुष्यात देखील ही पुस्तके परिवर्तनाची दिशा दाखवतील यात शंका नाही.
आपल्याला आवडणारी पुस्तके, लेखन प्रकार, लेखक यांची नावे 'कमेंट' करा, तसेच आपल्या काही सूचना असतील तर त्यासुद्धा सांगा. जेणेकरून त्याप्रकारचे साहित्य आपल्याला उपलब्ध करून देता येईल.
“करू ग्रंथ व पुस्तकांचे वाचन आणि 'श्रवण' ..वैचारिक संपत्तीचे होईल जतन’’
Source अर्थक्रांती

1 comment:

  1. 🤍 भुरा - शरद बाविस्कर

    ReplyDelete

Popular Posts