माझ्या मराठा बांधवांनो..!
(नाही नाही मला मराठी नाही ” मराठाच ” म्हणायचं आहे )
विशेषतः शिवभक्तांनो, शिवप्रेमींनो’ सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारांनो आणि सोबतच सो कॉल्ड हुच्चशिक्षितांनो
आठवतय का सहा महिन्यापूर्वी नगर जिल्ह्यातल्या एका शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता.नाही आठवत? अरे ती ती कोपर्डीतली मुलगी तुमच्या मराठा जातितली…हं आत्ता आठवलं ना…नाही म्हटलं आजच्या या अभद्र काळात कुठलीही गोष्ट ध्यानात राहायलाही जातीचाच संदर्भ द्यावा लागतो. तेही खरचय म्हणा जात हा फॅक्टर जळूसारखा तुमच्या माझ्या मनाला चिकटलाय! चिकटवलाय अगदी जन्मापासूनच.
तर असो…तुम्हांला कोपर्डीतली तुमची जिजाऊची लेक आठवली हे बरच झालं, आणि पुढे हेही आठवत असेल की, ती पिडीत मुलगी तुमच्या जातीतली आहे हे कळल्यावर’ तुम्हारा खून वगैरे खोल उठा था’. तळपायाची आग मस्तकाला गेली होती. अत्याचार करणाऱ्यांविरोधात तुम्ही तुमच्या तलवारी उपसल्या होत्या…वगैरे वगैरे. ती तुमच्या जातीतली आहे म्हणून तिच्यावरच्या अत्याचारांविरुद्ध तुमच्या रक्ताला काही काळापुरत्या तरी उकळ्या फुटल्या होत्या. तर असो…हेही नसे थोडके… त्याबद्दल तुमचं मन:पूर्वक अभिनंदन. तुम्ही एकत्र आलात मोर्चे काढले…सरकारला निवेदनं दिली. तुम्ही तुमचं काम केलं.
तर काय झालय की, काल लातूर जिल्ह्यातील एका मुलीनं आत्महत्या केलीय. तुम्ही म्हणाल, ‘अशा आत्महत्या तर राजरोस घडतात. आम्ही काय करु?’ पण ती मुलगी तुमच्या मराठा जातीतली आहे. तिच्यावर कोपर्डीतल्या मुलीसारखा काय दुसऱ्या जातीतल्यांकडून अत्याचार वगैरे झाला नाही. किंवा कुणाच्या छेडछाडीला कंटाळून तिने जीवन संपवलेलं नाही. तर तिने तुमच्या जातीतल्या मुलीला लग्नात दिल्या जाणाऱ्या भरमसाठ हुंडापद्धतीला कंटाळून आपल्या मौल्यवान जीवनाचा शेवट केलेला आहे. विश्वास नाही बसत. तुम्ही तिची सुसाईड नोट वाचा, म्हणजे विश्वास बसण्याची शक्यता आहे.
“मी शितल व्यंकट वायाळ चिठ्ठी लिहिते की, वडील मराठा कुणबी कुटुंबात जन्मले. शेतात पाच वर्षांपासून नापिकी असल्यामुळे कुटुंबाची स्थिती हलाखीची आहे. माझ्या दोन बहिणींचे लग्न ‘गेटकेन’ (साध्या पद्धतीनं) करण्यात आलं. परंतु माझे लग्न करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती. कर्जही मिळत नव्हते. तरी बापावरील माझे ओझे कमी करण्यासाठी व मराठा समाजातील रूढी परंपरा, देवाण-घेवाण कमी करण्यासाठी मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे.”
तिच्या आत्महत्येचं कारण डोक्यात न शिरण्याएवढे बाळबोध तुम्ही नक्कीच नाही आहात. मग आता उसळतय का रक्त? गेली का तळपायाची आग मस्तकात? कोपर्डीतली मुलगी तुमच्या जातीची होती. तिच्यावर अत्याचार करुन तिला संपवणाऱ्यांविरुध्द तुम्ही तलवार उपसली होती. शितलच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांविरुध्द उपसा न तलवार आता… तिच्या आत्महत्येला जबाबदार तुमच्या जातीतल्या रुढी परंपराच आहेत ना? मग करा ना… त्या आघोरी प्रथांविरूद्ध एल्गार..! कोपर्डीतल्या प्रकरणाची पुनरावृत्ती होवू नये म्हणून तुम्ही लाखोंची मोर्चेबांधणी केली, आता हजारोंनी नाहीतर गेलाबाजार शेकड्यांनी तर एकत्र या…करा उभी हुंडाविरोधी पुरूष संघटना. टाका बहिष्कार बाजारु विवाहपद्धतीवर. आहे हिंमत? की ” माझी इच्छा नाही बुवा हुंडा घ्यायची घरच्यांचाच खूप आग्रह आहे हुंड्याचा आणि हौसे-मौजेचा.”असा डायलॉग मारुन घरच्यांच्या पदराखाली जावून लपणार आहात?
तुम्ही मर्द मराठी मावळे…शिवबाचे अवतार…सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणाऱ्या संभाजीचे वारसदार ना? मग कुठं गेलेत तुमचे सिंहाचे दात मोजणारे हात?
गळ्यात भगव्या माळा आणि कपाळावर भगवा नाम ओढून कुणी शिवा-संभाचे अवतार होत नसतं भावांनो… त्यासाठी त्यांच्याइतकी वैचारिक उंची असावी लागते.
बापाकडे हुंड्यासाठी, देण्याघेण्यासाठी पैसे नाहीत. शेतात वर्षानुवर्षे काही पिकत नाही. पिकलं तरी सरकार पुरेसा भाव देत नाही, अशामुळे बापाला कुणी कर्ज देत नाही, म्हणून तिचं लग्न जमत नाही. (आणि लग्न म्हणजे तर एका मुलीच्या आयुष्याची इतिकर्तव्यता.’ हे तुम्ही आणि तुमच्या पूर्वजांनीच तिच्या मनामनावर गोंदवलय. मग तिला लग्न म्हणजेच आपल्या आयुष्याचं कल्याण, असं वाटलं तर दोष तिचा नाही. तिच्या मनात तशा विचारांचं बिज रुजवणाऱ्या तुमच्या समाजाचा, तुमच्या समाजातल्या थोरा-मोठ्यांचा आहे.) म्हणून तिने बापावरचा भार हलका करण्यासाठी स्वतःला संपवलं. याला जबाबदार असणाऱ्यांविरूद्ध तुम्ही करणार आहात का एल्गार आता? आपल्या जातीतली जिजाऊची लेक जर या कुप्रथेचा बळी जात असेल, तर तिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांना लटकवणार नाहीत का फासावर? जीव तर कोपर्डीतल्या तुमच्या भगिनीचाही गेलाय आणि लातुरच्या शितलचाही गेलाय. फक्त कारणं वेगळी आहेत. दोघीही तुमच्या सो कॉल्ड मराठा जातीतल्याच आहेत. मग काय प्रॉब्लेम आहे? की तुमच्या समाजातल्या अजून काही शितलनी या अघोरी हुंडापद्धतीमुळे लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या करण्याची वाट पाहणार आहात तुम्ही ?
“कोपर्डी घटनेच्या विरोधातल्या मोर्च्यामध्ये फक्त मुक्याने चालायचं तर होतं. कचरा गोळा करायचा होता. पाणीवाटप, चहा वाटप करायचं होतं म्हणून आम्ही सहभागी झालो होतो. हुंड्याविरोधात आवाज उठवायचा म्हणजे स्वतःच्या घरावरच धोंड येणार की. इथं साध्या गुरं राख्याला लाख-लाख हुंडा येतोय आणि आम्ही तर सहज पाचसहा लाखाचे धनी. हुंड्याविरोधात बोलायचं म्हणजे लग्नातल्या मानपानाला, प्रतिष्ठेला, हौसेमौजेला आम्ही मुकायचं का? आमच्या आई-बापानं आमच्या शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा कुठून वसुल करणार आम्ही? काहीतरीच काय हुंडा घेवू नका म्हणे.”
आताही तुमचा मेंदू जर असाच वैचारिक दरिद्रीपणा दाखवणार असेल, तर कुठल्याच मुलीवरच्या अत्याचाराविरोधात तोंडातून ‘ब्र’ काढायचाही तुम्हाला अधिकार नाही. त्याबाबतीत तुम्ही नालायक आहात.
तुमच्या झोळीत धोंडा पडणार म्हटल्यावर नाही तुमचं रक्त गरम होणार. ना की तुमच्या तलवारी सळसळणार. जिथे एका आण्याचीही झळ तुमच्या खिशाला बसत नाही, तिथे तुम्ही समाजकार्याचा कोरडा आव आणणार. आपल्या कर्तृत्वाचे झेंडे फडकवण्याच्या पोकळ वल्गना करणार. होय ना? पटत नाही माझं म्हणणं? एक काम करा…आरशात स्वतःचा चेहरा पाहा. शून्य मिनिटात माझा शब्द न् शब्द तुम्हांला खरा वाटेल. (आणि तेही खरच तुम्ही शिवा-संभाचे मावळे असाल तर ) आणि आरशात पाहूनही जर तुम्हाला स्वतःचा चेहरा ओळखता येत नसेल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने नामर्द आहात.
सासऱ्याच्या जीवावर तुम्हाला फुकटची हौसमौज हवी आहे. चारचौघात बडेजावपणानं हुंड्याचे आणि सोन्याचे आकडे मिरवायचे आहेत.आणि शक्य झालं तर बुडाखाली बुलेटसुद्धा हवीय तुम्हाला रुखवतात…पण पोरीचा चहूबाजूंनी झोडपून निघालेला शेतकरी बाप या तुमच्या डामडौलाची तजबिज कसा करत असेल? याचा विचार तरी शिवतो का तुमच्या मनाला? “आम्ही नकोच म्हणतो पण मुलीकडचेच ऐकत नाहीत.” चिडून हा बचावात्मक पवित्राही तुम्हाला घ्यावासा वाटतो. पण तुम्ही अशा गोष्टींना ‘नको’ म्हणण्याची सवय का लावून घेत नाही स्वतःला? ” आम्ही मागणार नाही, पण जे देईल त्याला नाही म्हणणार नाही.” या तुमच्या भूमिकेमुळेही ही देण्याघेण्याच्या प्रथेला अधिकाधिक खतपाणी मिळत जात आहे.” त्या अमक्याच्या पोराला एवढा हुंडा आला… एवढं सोनं आलं… आमच्या पोराला तर याहून जास्त आम्ही घेणार ही तुमच्या आईबापाची मानसिकता तुमच्याशिवाय दुसरं कुणीही बदलू शकत नाही माझ्या भावांनो…
मला तर तुमच्यापेक्षा आदिवासी लोक अधिक वैचारिक उंचीचे वाटतात. शक्य झालं तर शिका त्यांच्याकडून काही.
आज लातूरच्या शितलने आत्महत्या केली. उद्या तुमच्या गावातली तुमच्या शेजारची एखादी मुलगी हा चुकीचा मार्ग पत्करेल. तेव्हाही नुसत्या बातम्या वाचून असेच षंढासारखे गप्प बसणार आहात की, जिजाऊच्या लेकीवर ही वेळ का आली? यावर काही आत्मचिंतन करणार आहात माझ्या भावांनो?
(ता.क.: आमच्या जातीतल्या गोष्टीवर बोलण्याचा काय अधिकार आहे. असा प्रश्न उपस्थीत होण्याआधी मीच सांगते की, माझ्या जातीतल्या वाईट गोष्टींवर बोलण्याचा मला पूरेपूर अधिकार आहे.)
(लेखिका सोलापूरमधील शिक्षिका आहेत.)
kavitananaware3112@gmail.com
No comments:
Post a Comment