भारतातील ‘इंडिया’
माझा एक मित्र अमेरिकेत राहतो. त्याने एकदा आपल्या मुलीला भारतात पाठविले. भारत पहायला. आपला देश कसा आहे, आपला गाव कसा आहे, तेथील लोक कसे आहे, निसर्ग कसा आहे, नद्या कशा आहे, वगैरे अनेक गोष्टी तिने पहाव्यात अशी त्याची इच्छा होती. मुलगी दहा बारा वर्षांची, अमेरिकेत शिकलेली, वाढलेली. विमानातून मुंबईत उतरली. काही दिवसांनी आमच्या गावी आली. काही दिवसताच कंटाळी. कोणकोणत्या गोष्टी तिला आवडल्या नाहीत, हे मी सांगण्याची गरज नाही. आपण कल्पनेने सहज ओळखू शकाल.
पण महत्त्वाची बाब होती ती म्हणजे भाषा. तिला मराठी बऱ्यापैकी येत नव्हती त्यामुळे तिचा कोंडमारा झाला होता. तिच्या अनेक शंका होत्या. त्यांचे निरसन करणे मला कठिण जात होते. एकेदिवशी तिने `म्हैस अशी असते'? असा प्रश्न विचारला आणि आश्चर्य व्यक्त केले. `आम्ही चहासाठी दूध वापरतो, ते याच म्हशीचे ', असे जेव्हा मी तिला सांगितले तेव्हा ``शीऽऽ'' असा उद्दगारच तिच्या तोंडून बाहेर पडला. शिवाय तिचे तोंड पहाण्यासारखे झाले होते.
`अंकल, असल्या घाणेरड्या, काळ्या , डर्टी प्राण्याचे दूध तुम्ही चहासाठी वापरता? म्हणजे मी जो आतापर्यंत चहा पीत होते त्या चहात या प्राण्याचे दूध घालीत होता?'' असे तिने एका मागोमाग अनेक प्रश्न विचारले. आपण असला चहा यापुढे पिणार नाही. तिने असा निश्चय का करू नये? अमेरिकेत तिने दूध देणारी म्हैस पाहिलीच नव्हती; तिचा काय दोष? तिचे जग वेगळे होत. पाश्चात्य संस्कृतीतले, साठ सत्तर वर्षे आमच्यापुढे असलेले. शिवाय तिच्या आईवडिलांनी तिच्यामनात स्वदेशाबद्दल स्वाभिमान. प्रेम निर्माणच केले नसेल तर तिचादोष काय? आपण भारतीय लोक स्वदेशाबद्दल, स्वसंस्कृतीबद्दल कितीसे भरभरून बोलतो, कितीसए जिव्हाळ्याचे बोलतो? त्या मुलीने मात्र मला विचार करायला लावले.
माझे मन `इंग्रजांच्या' नव्या संस्कृतीविषयी विचार करू लागले. आम्हा भारतीयांना परक्यांच्या गोष्टी फार आवडतात. इंग्रजांची भाषा आपल्याला मोहिनी घालते की नाही? ही एकच गोष्ट अशी आहे की, या देशातले भलेभले तिच्या प्रेमात पडले आणि प्रेमासाठी मेल. श्रीकृष्णाने पूतना मावशीला मारले ही एक पुराणातली गोष्ट. इंग्रजी भाषा ही आपली मावशी आहे, असा अनेकांचा समज आहे. आजचे श्रीकृष्ण `आई मरो अन् मावशी जगो' असेच म्हणतात. मागील शतकात विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी याच मावशीला डोक्यावर घेतले होते. इंग्रजी भाषा म्हणजे वाघिणीचे दूध म्हणून तिचा गौरव केला होता. तो गौरव आजही चालू आहे. किंबहुना या मावशीबद्दलचे लोकांचे प्रेम वाढतच आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पीक वाढत आहे. वाढो बापडे. भारतात `इंडिया' नावाचा देश आहे. त्या देशातील लोकांना इंडियन्स् म्हणतात. तेही स्वतःला इंडियन्स् म्हणवून घेण्यात धन्यता मानीत असतील तर इतरांनी बोटे का मोडवीत? तेली का तेल जले, मशालजीका जी जले! इंडियातले हे तेली आणि मशालजी एकच आहेत.
विष्णुशास्त्री चिपळूणकर खरा थोर माणूस, मराठी भाषा ही त्यांना एखाद्या चिखलात बसलेल्या, रूतलेल्या म्हशीसारखे वाटली असेल काय? तसे म्हणावे तर कठीण. कारण पुन्हा ते स्वतःला मराठीचे शिवाजी म्हणवत असत. आपण भारतीय लोक एकदम हुशार. `परभाषा' `स्वभाषा' करून घेण्यात केवढं औदार्य दाखवितो? आता तर इंग्रजीसारख्या भाषेशिवाय आणकी एकादी भाषा जगात असू शकते, यावर या मंडळींचा विश्वासच नाही. त्यांची नैतिकता एवडी उंचावली आहे की बोलून सोय नाही.
जगाच्या पाठीवर स्वभाषा नसलेला देश म्हणजे भारत. असे का? आक्रमकांची भाषा स्वीकारायची ही इतल्या शासकवर्गाचा नित्याचा नियम आहे. शासक हे सत्तेचे महत्त्वाचे स्थान बाळगून असतात. त्यांनी स्वतःच्या स्थानांपलीकडे देशाला काही स्थान आहे, स्वभाषेला काही स्थान आहे, असे का मानावे? असे मानल्यामुळे आपल्या पदरात असे काय मोठे पडणार आहे? स्वतःचा देश नसलेले लोक, स्वतःची भाषा नसलेले लोक, स्वतःची संस्कृती नसलेले लोक, असे आम्हाला कोणी हिणविले म्हणून आमचे काय वाकडे होणार आहे? आपण नित्यनियमाने वाघिणीचे दूध पीत राहू या! लोकांना काय वाटते, याचा विचार करण्याचे कारण नाही.
निर्लज्ज माणूस सदासुखी असतोच का नाही? आपण अकारण `इंडिया'चा उद्धार करीत राहतो. भारत हा काही `इंडिया पेक्षा मोठा नाही. `ब्रिटीश' `इंडियन' सरकारचा विजय असो.
रशियात झालेल्या एका भाषापरिषदेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती मालतीबाई बेडेकर यांनी एक आठवण सांगितली होती. ती मोठी मार्मिक आहे. भारतातील विविध भाषा बोलणाऱ्या लेखककवींना या परिषदेला आमंत्रित करण्यात आले होते. परिषद संपली तेव्हा सर्व भारतीय कविलेखक एकत्र आले आणि इंग्रजीत बोलू लागले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एका रशियन लेखकाने त्यांना विचारले, ``तुमच्या देशाला स्वतंत्र भाषा नाही काय? तुम्ही सारेजण इंग्रजीसारख्य़ा परकीय भाषेत का बोलता? ही तर तुम्हांला, तुमच्या देशाला गुलाम करणाऱ्या देशाची भाषा!'' हे ऐकून सर्व भारतीय कवि, लेखक निरूत्तर झाले होते. आमचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, असे मालतीबाई बेडेकरांनी सांगितले.
आम्हाला आमच्या भाषेत बोलायला कमीपणा वाटतो, हे त्याचे कारण असेल का? मग रशिया, फ्रांस, जपान, चीन या देशांचे पंतप्रधान आमच्या देशात आल्यावर आपापल्या भाषेत का बोलतात? त्यांना कमीपणा वाटत नाही काय?
मुंबईच्या एका संस्थेत रशियन भाषा शिकविण्याचे वर्ग चालतात. तेथे मी कधी कधी जात असे. एकदा एका मुलीला सहज गमतीने प्रश्न विचारला.
`काय ग, तू रशियन का शिकतेस?'
`रशियाचं आपल्या देशावर कधीकाळी राज्य आलं तर चटकन नोकरी मिळेल!' असं त्या मुलीन उत्तर दिलं होतं. या तिच्या उत्तरात भारतीय मनोवृत्तीचं प्रतिबिंब उमटलं आहे. मी आजही विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्ही कशासाठी शिकता? तेव्हा त्यांचं उत्तर `नोकरीसाठी' शिकतो, असंच असतं. मुलांच्या आईवडीलांची मनोवृत्ती त्यांच्या मनोवृत्तीत प्रवर्तीत होते हे याचे कारण आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशासाठी काढता? असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा या प्रश्नाचेही उत्तर `नोकरी' हेच असते. आईवडिलांनी `नोकरी'चा एवढा धसका का घ्यावा, याचे आश्चर्य वाटते. `मी ज्ञानासाठी शिकतो' `ज्ञान विचार करायला शिकविते,' म्हणून शिकतो' असे कोनीही उत्तर देत नाही. `भाकरी आणि भाकरी' मिळविणे एवढाच माफक विचार आमच्या शिक्षणात आहे. उच्च दर्जाची नोकरी फक्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यामुळेच मिलते हा लोकांचा समज आहे. आणि तो त्यांनीच पसरविलेला आहे. भारतातील हे इंडियन लोक धन्य होत. याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणता येईल. समाजातील `महाजन' ज्या वाटा मिळतात, त्याच बरोबर असतात, असे चित्र नेहमी दिसते, नव्हे समजले जाते. ते करतात तेच बरोबर अशी धारणा होते., नव्हे असते.
शिवाय अशा शाळांत राष्ट्रीय एकात्मता फार लवकर येते. राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रचाराची नव्याने गरज भासत नाही. फक्त हवा तो भरपूर पैसा इंग्रजी माध्यमाची शाळा किंवा कॉन्व्हॅट स्कूल म्हणजे प्रतिष्ठेची केंद्रे. एरव्ही ज्यांना फी भरणे परवडत नाही तेही या शाळांत आपल्या मुलांना घालतात, फी भरतात, म्हणेल ती फी किंवा मागाल ती फी विना तक्रार भरण्याची तयारि दाखवितात. बाकी `नेटीव्ह' लोकांच्य शाळा नेट लावून चालवायच्या, तेथे पाच रुपये मदत करा म्हटले तरी लोक नाराज होतात. पैसे नसतात. ते तरी काय करणार? गुलामच ते.
`मटक्याचा' धंदा करणाऱ्यांची मुले आणि `झटक्याचा' धंदा करणाऱ्यांची मुले अगदी शेजारी- शेजारी बसू शकतात. `पॉकेटमार' किंवा `काळाबाजार ' करणाऱ्यांची मुले सुद्धा शेजारी शेजारी बसु शकतात. धर्म, भाषा, प्रांत, वर्ण यांच्या भिंती कोसळतात. अगदी सरकारी क्लासवन ऑफिसरचा मुलगा आणि त्याच्याच शिपायाची मुलगी शेजारी शेजारी बसु शकतात. डॉक्टर, वकील, व्यापारी या सर्वांनाच वाटते की इंग्रजी भाषेची चलती आहे. नोकरी, चाकरी मिळवून देणारी ती गुरूकिल्ली आहे. इंग्रजांच्या राज्यावर अजूनही सूर्य मावळत नाही हेच खरे आहे. आपण आजही इंग्लडंच्या राणीचा राज्यकारभार तर सांभाळीत नाही ना? पुन्हा जर इंग्रजांचे राज्य आलेच तर अडचण नको. आयतीच भाषा उपयोगी पडेल.
साहित्य, सर्व प्रकारच्या कला, थोरांची चरित्रे ही तर ज्ञान संपादनाची, संस्कृतीच्या संवर्धनाची, अभ्यासाची साधने. यांचे पुढे काय होणार? ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास यांचे काय करणार? आधुनिक कविलेखकांनी निर्माण केलेल्या साहित्यसंपदेचे काय होणार? कॉमिक्सच्या चाऱ्यावर वाढणारी ही मुले पुढल्या आयुष्यात `ढिशॉंनऽऽ ढिशॉंनऽऽ' च्या वाटेने तर जाणार नाहीत ना? शिवाय आमची मुले मराठी म्हशींचे दूध पिऊन वाघाची डरकाळी कशी फोडणार? `काहीही होवो, तुम्हांला या उठाठेवी हव्यात कशाला?' असा माझा आतला आवाज मला अलीकडे सतावू लागला आहे.
सर्वाचे आभारी आहे.
No comments:
Post a Comment