लेकीकडे जाईन तुप रोटी खाईन..
वाघोबा म्हणतो खाऊ का तुला
लांडगोबा म्हणतो खाऊ का तुला
मी म्हणते थांब जरा
खाशील काय हाडं नी काडं
लेकीकडे जाईन तुप रोटी खाईन
लठ्ठ गुठ्ठ होईन मग तु मला खा
लेकीकडे गेले गाय गोठा पाहिला
भंडार घर पाहिलं मन तृप्त झालं
आता ना कसली भीती ना चिंता
वाघोबा येऊ दे, लांडगोबा येऊ दे
घेतला निरोप आवरला गहिवर
दिली तीने तुप रोटी शिदोरीला
आई, काळजी घे,लठ्ठ गुठ्ठ हो
नातवाशी खेळायला ये पुन्हा
मनाने घेतली ऊभारी
भोपळ्यात जाऊन बसले
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक
वाघोबा, लांडगोबा टुक टुक
लेकीकडे जाईन तुप रोटी खाईन
...........................................................................................................................................
वाचली कविता..गम्मत वाटली न! आता पुन्हा कविता अशी वाचा..
तुप रोटी-समृद्धी व समाधानाचे प्रतीक, वाघोबा,लांडगोबा-यमदूतासमान, भोपळा- आनंदी मन
जीवापाड जपलेली,जीव की प्राण असलेली, सर्वगुणसंपन्न मुलगी सासरी जाते..व जीवनात पोकळी निर्माण होते.तिच्या आठवणीने मन व्याकुळ होत असते.औदासीन्याने ग्रासले असते.स्वतःकडे दुर्लक्ष होते..आणी वाघोबा लांडगोबा येतात..!लेकीला सुखी समाधानी पहावेसे वाटत असते,वाघोबा लांडगोबाला थोपवुन ठेवले जाते..सासरी गेल्यावर कळते ते सासर तर आपल्यामुळेच तीला माहेर असतं..तीच्यामुळेच हे आजोळही होणार असतं..!मनाला एक नवी ऊभारी येते..ही कविता आपण ’आजोळ’ असल्याचा आनंद व्यक्त करते..मनही ’बाळ’ होऊन जाते..!
No comments:
Post a Comment