Monday, 10 April 2017

जीवनव्रतीचे एक तप समाजसेवेचे...

अलकागौरी जोशी, पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधीसुधी मुलगी, सामान्य बुद्धिमत्तेचा मापदंड, चारचौघींसारखी बी.ए. झाली. व्यावसायिक छायाचित्रणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. करियरचा विचार करताना 'कशासाठी जगायचं' हा साधा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला आणि तो ध्यास घेऊन योग्य उत्तर धुंडाळत राहिली. काहीतरी वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगण्याचा तीव्रतेनं विचार करू लागली.भोवतालच्या घटनांनी स्वतःच्या मनात उमटणार्या सर्व साध्या प्रतिक्रियांची नोंद घेऊ लागली, वेगळं, अधिक चांगलं आयुष्य जगायचा नवा मार्ग शोधू लागली. 
अलकागौरी जरी स्वत:ला चारचौघींसारखी समजत असली तरी तिच्या अंतरंगात सुप्त का होईना, पण एक स्फुल्लिंग नक्कीच होता. घरची परिस्थिती सामाजिक कार्याला पोषक होतीच; त्यामुळे हे साहजिकच होतं. शिबिराच्या निमित्ताने अचानक ती विवेकानंद केंद्राच्या सान्निध्यात आली, आणि तिच्या अंतरंगातला स्फुल्लिंग चेतला! जीवने यावद् आदानं स्यात् प्रदानं ततोधिकम्' (आयुष्यात जितकं मिळालयं त्यापेक्षा जास्त द्यावं) या केंद्राच्या प्रार्थनेतल्या वचनानी तिला दिशा सापडली. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत हे स्वामी विवेकानंदांचे आवाहन आणि अथक परिश्रमाने कठीण, विपरीत परिस्थिती बदलता येते, असाध्य ते साध्य करता येतं हा सागरातील शिलास्मारकानं दिलेला विश्वास तिला दीपस्तंभ वाटला. जीवनव्रती कार्यकर्ती होऊन अर्थपूर्ण जीवन जगणार्या केंदाच्या कार्यकर्त्यांच्या सागरात मिळून जायचे तिने ठरवले. 

जीवनव्रती होण्यासाठी कौटुंबिक आणि आर्थिक जबाबदारी नसावी, साधी राहणी, भारतभर कुठेही रहायची तयारी आणि कमीतकमी ५ वर्षे अविवाहित रहावे या अटी आहेत. ज्यांना निवृत्तीनंतर २ ते ३ वर्षे पूर्णवेळ काम करायचे आहे ते पूर्णवेळ वानप्रस्थी म्हणून काम करु शकतात. पूर्णकालीन कार्यकर्त्यांच्या योगक्षेमाची आणि निर्वाहाची जबाबदारी विवेकानंद केंद्राची असते. जीवनव्रती होण्यासाठी गौरीने आई-वडिलांची संमति घेतली. घरचं वातावरण सामाजिक कार्याला पोषक होतं तरी तिच्या आईने तिच्या निश्चयाची दृढता पारखली. आव्हानात्मक राष्ट्रकार्य करायला तिला आई-वडिलांनी प्रोत्साहितच केले. गौरीच्या भावंडांनी तिला पाठिंबा दिला. आपल्या ऐन तारुण्यात ३ वर्षे पूर्णकालीन कार्यकर्ते असणारे आजोबा आणि कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी उद्योगधाम-अनिकेत निकेतन या त्यांच्या कामात पुढाकार घेणार्या आजीने गौरीच्या पंखातील भरारी घेण्याचे सामर्थ्य जाणले. ११ जुलै १९९६ ला गौरीने विवेकानंद केंद्राची सेवाव्रती म्हणून केंद्राच्या विशाल घरात प्रवेश केला. 
सेवाव्रतीच्या प्राथमिक प्रशिक्षणानंतर नागपूर, नाशिकचं दायित्व मिळालं. कायर्पद्धतीची ३ अंगं - संस्कार, स्वाध्याय आणि योग वर्ग घेता घेता नित्य प्रार्थना आणि योगाभ्यासामुळे आत्मविश्वास वाढू लागला. स्वाध्याय वर्गातून वैचारिक स्पष्टता, सखोलता व सुसूत्रता आली. सततच्या कार्यकर्ता व्यक्तिमत्व विकास शिबीरांमुळे सामूहिक संस्कार झाले. लोकसंग्रह, लोकसंपर्क, लोकसंस्कार आणि लोकसेवा ही चतुःसूत्री डोळ्यांसमोर ठेऊन आदर्श समाज रचनेचे स्वप्न साकार कसे होईल याची स्पष्टता आली. आता मात्र गौरीला आपल्या कार्यक्षेत्राची जाणीव झाली. ही अडीच वर्षे संपल्यावर तिला घरी स्वस्थ बसवेना. पुन्हा तीन वर्षांसाठी व्रत स्वीकारले.पण महासागराला मिळालेली नदी परत फिरते थोडीच? त्यामुळे ही तीन वर्षे संपल्यावर तिथेच कायम कार्य करायचा निर्णय तिने घेतला. जीवनव्रती कार्यकर्ती होण्याचा ध्यास पूर्णत्वाला नेला. त्यासाठी कन्याकुमारीला प्रशिक्षण झालं आणि कार्यक्षेत्र मिळालं---- अरुणाचल!

ईशान्य भारतातले, तीन आंतरराष्ट्रीय सीमा असलेले राज्य अरुणाचल! निसर्गसौंदर्याने संपन्न; निसर्ग व ईश्वराच्या सान्निध्यात राहणाऱे तेथील नितळ, पारदर्शी स्वभावाचे लोक! पण तेथील परिस्थिती मात्र खडतर, प्रतिकूल! आठ नऊ महिने पावसाळा, बेताची वाहतूक व्यवस्था, प्रचंड ब्रह्मपुत्रा आणि तिचे ते पूर; या तर नैसर्गिक अडचणी. याबरोबर धर्मांतर; पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव; युवकांना व्यसनाधीन, निष्क्रीय बनवणाऱ्या स्वार्थी, देशद्रोही प्रवृत्ती; आणि एवढं पुरेसं नाही म्हणून की काय, सशस्त्र अतिरेकी संघटना. यामुळेच विवेकानंद केंद्राचं मुख्य काम 'सृजनात्मक नेतृत्व' घडवणे! आणि 'संस्कृतीच्या माध्यमातून विकास' हे ब्रीद! त्यांच्या कार्याचे तीन भाग म्हणजे 1) शिक्षा 2) सेवा व 3) संस्कृतीसंवर्धन.
विवेकानंद केंद्राचे कार्य- अरुणाचलमधे केंद्राचे काम 1974 पासून सुरू झाले. 1977 साली सात शाळा सुरू केल्या; आता 34 इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधे 12000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. थेथे सी.बी.एस.इ. चा अभ्यासक्रम राबवला जात आहे.
1993 मधे केंद्राचा अरुणज्योती हा सेवा प्रकल्प सुरू झाला. या सेवा केंद्राचे पाच मंच आहेत.
1. अनौपचारिक शिक्षा मंच
2. स्वास्थ्य सेवा मंच
3. महिला मंच
4. युवा मंच
5. संस्कृती मंच. 
अनौपचारिक शिक्षा मंचाअंतर्गत विविध गावांमधे व शहरांमधे मिळून इंग्रजी-हिंदी 137 बालवाड्या चालवल्या जातात. तेथे 236 प्रशिक्षित बालसेविका व 20 प्रबंधिका काम करतात. सुमारे 2186 मुले यात शिकत आहेत.चौदा ठिकाणी संस्कार वर्ग घेतले जातात.
15 खेड्यांमधे शाळेला पूरक अशी 44 आनंदालये आहेत. शिक्षणात गोडी वाढावी या उद्देशाने ती चालवली जतात. अडीच तासांच्या याच्या वेळात गणित व भाषा यांचा पाया पक्का करून घेतला जातो, याशिवाय गृहपाठ, देशभक्तीपर गाणी, योग, शास्त्राचे प्रयोग इत्यादी घेतले जाते. खेळांमधून, आनंददायी शिक्षणपद्धतीनुसार हा उपक्रम राबवला जातो. येथे 45 आचार्य असून 685 विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
स्वास्थ्य सेवा मंच तर्फे मोफत तपासणी शिबिरे, 2008 पासून मोफत शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केली जात आहेत. यासाठी एन.आर.आय. डॉक्टरांची टीम येथे सेवा देत आहे. कोल इंडियाच्या पासीघाट येथील जनरल हॉस्पिटल मधे यावर्षी पन्नास शस्त्रक्रिया झाल्या. याबरोबरच प्रतिबंधात्मक उपायांकडेही लक्ष दिले जाते. त्यासाठी 29 गावांतल्या युवकांना स्वास्थ्य रक्षक म्हणून प्रशिक्षण दिले गेले. आता आरोग्याविषयी
जागृती वाढते आहे.
.महिला मंच –समाज घडणीतील स्त्रीचे महत्त्व लक्षात घेऊन महिला शिबिर हा अरुण ज्योती केंद्राचा महत्त्वाचा उपक्रम बनला आहे. 'राष्ट्र निर्मितीतले आईचे महत्त्व ' ही मुख्य संकल्पना व त्याचबरोबर – आई हा आरोग्य,स्वच्छता, संस्कृतीचा उगम;-तिचे मुलांच्या जडणघडणीतले स्थान; या कल्पनांवर आधारित अकरा कॅंपस् घेण्यात आले. त्यांमधे शिलाई, अन्नप्रक्रिया यांसारखे व्यवसाय शिक्षण तसेच व्याख्याने, गटचर्चा, योग, खेळ, भजने यांचाही समावेश करण्यात आला. शाळेतून गळती झालेल्या 200 मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नावाच्या दोन शाळा उघडण्यात आल्या. विद्यार्थ्यांना, विशेषत; विद्यार्थिनींना एक हजार सौर दिवे देण्यात आले.त्यामुळे दूरदूरच्या खेड्यांतल्या घरांमधेही उजेड पसरला.
युवा मंच- सध्या अठ्ठावीस कॉलेजेसमधे केंद्र यूवा मंचाच्या माध्यमातून कार्यरत आहे. युवकांच्या नेतृत्वगुणाचा विकास तसेच व्यक्तिमत्व विकास यासाठी विजय ही विजय शिबिर घेतले जाते; शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधून अल्पकालीन कार्यकर्ते निवडले जातात; आणि या कार्यकर्त्यांच्याच सहाय्याने 'अवेअरनेस प्रोग्राम' हा कार्यक्रम युवकांच्या जागृतीसाठी राबवला जातो.त्यात खेळ, सूर्यनमस्कार, देशभक्तीपर गाणी, देशभक्तांच्या गोष्टी/चरित्रे, आपली संस्कृती, स्वच्छतेचे महत्त्व, त्यासाठी उपक्रम याचा अंतर्भाव असतो. 11 सप्टेंबर हा शिकागो अधिवेशनाचा दिवस विश्वबंधुत्व दिवस म्हणून साजरा केला जातो. 
युवा मंचचे यावर्षी साजरे झालेले आणखी कार्यक्रम म्हणजे- छात्र सन्मान समारोह, युनिव्हर्सल ब्रदरहूड,समर्थ भारत पर्व,परीक्षा दे हसते हसते, परशुराम कुंड यात्रा इ.
संस्कृती मंच- संस्कृतीसंवर्धन हे केंद्राचे ब्रीदच असल्याने त्यासाठी कार्य आहेच. शिक्षणामुळे झालेले बदल आता दिसताहेत. जागृती निर्माण करणे हे केंद्राचे मुख्य ध्येय! जागृत लोक नंतरचे बदल स्वत:च करतील. (ब्रिंग अवेअरनेस; लेट देम डिसाइड.)
तिथल्या दहा जमातींसाठी 'ट्रॅडिशनल सिस्टिम्स –चेंज अँड कंटिन्युइटी अशासारखे सेमिनार्स घेण्यात येतात. गुरू पौर्णिमा, रक्षाबंधन, गीताजयंती इत्यादी साजरे केले जातात.
अशा तऱ्हेने अरुण ज्योती प्रत्येकापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत पोचून त्यांना आशेच्या किरणांमार्गे विकासाच्या प्रकाशापर्यंत नेत आहे. 
केंद्राचे कार्यकर्ते प्रांतसंघटक, विभागसंघटक, नगर संघटक, असे पूर्णकालीन तर प्रांतप्रमुख, विभागप्रमुख, नगरप्रमुख असे स्थानिक दायित्ववान अशा वेगवेगळ्या पदांनुसार कार्य करत आहेत.त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. ते 'लेट गो इगो,' 'शेअरिंग,' 'प्रॅक्टिस ऑफ सेल्फलेसनेस,' कर्मण्येवाऽधिकारस्ते---, अशा तत्त्वांवर आधारित असते. शिवाय प्रेपरेशन ऑफ सेकंड लाइन, म्हणजे कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार ठेवावी लागते.
अशी आपल्या दृष्टीने बिकट वाटेने जाणारी अलकागौरी मात्र म्हणते, ' या कार्याने मला---दुसऱ्यांसाठी केलेलं छोटंसं कार्यही हृदयात सिंहाचं बळ आणतं – या विवेकानंदांच्या शब्दांचा अनुभव आला. कामाने मला लोकांमधला देव दाखवला; जीवन खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद दिला.' अलकागौरीसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी झोकून देऊन विवेकानंद केंद्राचे कार्य जोमाने चालू ठेवले आहे. 
2013-14 मधे स्वामी विवेकानंदांची 150 वी जयंती साजरी होणार आहे. यात सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रत्येक तरुणाने आपल्या आयुष्यातील किमान दोन वर्षे सेवाव्रती-पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून द्यावीत.

Thanks
चंदा कोलटकर/अंजली रानडे

No comments:

Post a Comment

Popular Posts