बाहुबली-२चे धर्मवादीकरण काही लोकांनी इमानेइतबारे पार पाडून इंडस्ट्रीसाठी नवा खेळ सुरु केलाय. त्यांना आता मोठे कोलित हाती लागले आहे. ११ ऑगस्ट २०१७ ला दोन चित्रपट रिलीज होताहेत. यातला एक आहे अक्षयकुमारचा 'टॉयलेट एक प्रेमकथा' आणि शाहरुखखान अभिनित दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'रौला'. अक्षयचा सिनेमा पीएम मोदीजींच्या महत्वाकांक्षी स्वच्छता अभियानाशी थीमसाधर्म्य असणारा व महाराष्ट्रात घडलेल्या एका सत्यकथेवर आधारित आहे, तर 'रौला' हा अनुष्का शर्मा - शाहरुखचा हलका फुलका रोमान्सपट आहे. या दोन सिनेमातील लढत कलेच्या दृष्टीकोनाऐवजी जातधर्माच्या आणि स्वयंघोषित राष्ट्रीयत्वाच्या सापेक्षतेनुसार सोयीस्कररित्या रंगवली जाईल अशी चिन्हे सोशल मिडीयावर आत्ताच दिसू लागली आहेत.
यापूर्वी अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार' आणि एसआरकेचाच 'जब तक है जान' यात अशीच टक्कर झाली होती. त्याची पुनरावृत्ती 'शिवाय' आणि 'दिलवाले'च्या निमित्ताने पुन्हा अनुभवास आली. तर एसआरकेच्याच 'रईस' आणि ऋतिकच्या 'काबिल'ला देखील असे रंग देण्याचे प्रयत्न झाले होते. सनी देओलच्या 'गदर एक प्रेमकथा' आणि आमीरखानच्या 'लगान'च्या वेळेस असाच तणाव जाणवला होता. विशेष म्हणजे यांच्यातच याआधी 'घायल'आणि 'दिल'च्या वेळेस अशीच टक्कर झाली होती.
योगायोगाने २०१३ च्याही ऑगस्टमध्येच खिलाडीकुमारच्या 'वन्स अपोन टाईम इन मुंबई दोबारा' आणि एसआरकेच्याच 'चेन्नई एक्सप्रेस'मधली टक्कर फक्त एक आठवड्याने टळली होती. खरे तर हे दोघेही अभिनेते भिन्न प्रकृतीचे आणि वेगळ्या धाटणीचे अभिजात कलावंत आहेत. ते आपल्या जागी श्रेष्ठ आहेत यात शंका नाही. त्यांच्यात अगदी निखळ दोस्ताना नसला तरी वैमनस्यही नाही हे सर्वश्रुत आहे मात्र काही फुटकळ चाहते व धर्मवादाचे झेंडे नाचवणारे संधीसाधू या दोघांना वेगळे 'रंग' लावून, आपल्या चष्म्यातून त्यांच्यातील संबंध जोखू लागले आहेत ही खेदाची बाब आहे....
अक्षयने त्याचा 'एअरलिफ्ट' प्रजासत्ताक दिनाजवळ (२२ जानेवारी) रिलीज केला होता तर 'रुस्तुम' स्वातंत्र्यदिनाआधी तीन दिवस रिलीज केला होता. आता पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनाच्या चार दिवस आधी तो त्याचा महत्वाकांक्षी चित्रपट घेऊन येतोय. मागील पाच वर्षात अक्षयला काही लोकांकडून 'अँटी'खान आणि पॅट्रीऑटीक आयकॉन म्हणून जाणून बुजून प्रोजेक्ट केले जातेय. तर शाहरुख त्याच्या वादग्रस्त वक्तव्याने काही लोकांच्या देशद्रोह्यांच्या यादीत नामांकित झाला आहे. या शिवाय या दोघात अलीकडील काळात सुरु असणारे टशन सर्वश्रुत आहे. यांच्यात शीतयुद्ध व्हावे असे इंटरटेनमेंट मिडीयाला वाटते कारण त्यातून त्यांचे टीआरपीचे गणित साधते. भारत पाकिस्तान युद्धाच्या वावड्या उठल्या की न्यूज मिडीयाचा टीआरपी चांगला वधारतो त्यामुळे तेही अशा तथाकथित वादांची वाट बघत असतात. त्यावर आपली पोळी भाजून घेतात. या सर्व शक्यता अशक्यतांच्या गणितावर कडी होईल ती, रिलीजच्या काळात असणारया(पंधरा ऑगस्ट) देशभक्तीच्या वारयाची. त्यामुळे 'टॉयलेट एक प्रेमकथा' आणि 'रौला'च्या निमित्ताने एक तुंबळ शीतयुद्ध बॉलीवूड आणि रसिकांना अनुभवाला येईल अशी चिन्हे आहेत.
कोणतीही स्पर्धा ही निकोप असावी अन कलागुणांवर आधारित असावी याचा विसर हळूहळू सर्वच क्षेत्रात पडत चाललाय हे दुर्दैवी आहे. असो...या सर्व प्रकारातून बॉलीवूडला धार्मिक रंग देण्यात येतोय जो कलेच्या निकोप जोपासनेसाठी निश्चितच योग्य नाही...
या दोन्ही चित्रपटांना माझ्याकडून शुभेच्छा ...
- समीर गायकवाड.
(सूचना - पोस्टवर जातीय / धार्मिक वा वैयक्तिक द्वेषमूलक कॉमेंटस करू नयेत.)
No comments:
Post a Comment