Thursday, 27 April 2017

'सैराट' वर्ष : असे होते, याड लावलेल्या या चित्रपटाचा सर्वेसर्वा नागराज मंजुळेचे पूर्वायुष्य

सैराट.. या तीन अक्षरांच्या शब्दाने अक्षरशः गेल्या वर्षभरात मराठी चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टीकोनच बदलून टाकला आहे. 29 एप्रिल 2016 रोजी सैराट चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर जे घडले तो इतिहास होता. नागराज मंजुळे हे नावही तसेच काहीसे जादुई. सैराटचे सर्व श्रेय नागराज मंजुळेचे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. त्यामुळेच सैराटप्रमाणेच नागराजही सर्वांसाठी आकर्षणाचा विषय राहिला आहे. सैराटच्या प्रदर्शनाला शनिवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आपण सैराटचा सर्वेसर्वा असलेल्या नागराज मंजुळेच्या आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत.

नागराज मंजुळे यांचे आयुष्य प्रचंड विलक्षण असे राहिलेले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याविषयी वर्णन केले आहे. विशेषतः त्यांचे बालपण हे प्रचंड चढउतारांचे राहिलेले आहे. प्रचंड व्यसनाधीनता आणि सातवीत असताना अचानक या सर्वातून बाहेर पडणे हे वाचायला वाटते तेवढे प्रत्यक्षात सोपे नाही. या मुलाखतीच त्यांच्या जीवनातील अनेक पैलू समोर आले आहेत, तेच या माध्यमातून वाचकांसाठी देत आहोत. या पैलूंच्या आधारे नागराज मंजुळे आणि त्यांच्या चित्रपटांबाबत जास्तीत जास्त समजून घेता येईल.
 
 
 
Source: दिव्य मराठी

VFX हेच होते 'बाहुबली'चे खरे बळ, पाहा कसे तयार झाले होते चित्रपटातील सीन्स

एंटरटेनमेंट डेस्क -दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा 'बाहुबली' आतापर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. या सिनेमाचा दुसरा पार्ट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील भव्य दिव्य दृष्ये आणि व्हीएफएक्स याचा सिनेमाच्या यशामध्ये मोलाचा वाटा होता. बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये जवळपास 5000 VFXचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे 'बाहुबली' सर्वात महागडा सिनेमाही ठरला होता. या VFX मुळे चित्रपटांतील काही साहस दृष्ये किंवा अनेक सीन भव्य-दिव्य बनण्यास कशाप्रकारे मदत झाली हे आपण आज जाणून घेणार आहोत.








































Wednesday, 26 April 2017

गेले ते दिवस उरल्या केवळ आठवणी

गेले ते दिवस उरल्या केवळ आठवणी


कळकाने 'यांटीना'हलवून दूरदर्शनच्या मुंग्या घालवण्याचे ब्ल्याक यांड व्हायीट दिवस संपले. मर्फीचा 'रिडीव' कबीानाला लावून दुश्मनाचा माग काढल्यासारखे केंद्र बदलण्याचे दिवसबी संपले. मम्बयवरनी 'टील्फून' येताच या टोकावरून त्या टोकाला कुत्र्यागत धापा टाकत पळत जाण्याचे दिवस कव्वाच संपले. स्टीलच्या हातभार लांब 'ब्याटरिकीत' चार चार 'मसाला' शेल टाकून गावाबाहेर शिकार करायला निघाल्यासारखे चिनपाट घेवून परसाकडला जायचे दिवस संपले. क्यासेटांच्या रिळाचे बंडल ज्वारीच्या ताटांना बांधून पाखरं राखायचे दिवस संपले. साठ 'हूलटेजच्या' 'फिलीपच्या' बलात घरभर उजेड पडण्याचे दिवस संपले. एकदा चावी पिळली कि दिवसभर नं थकता गरागरा  फिरणाऱ्या यचेमटी घड्याळाचे दिवस संपले.चुव्वीस नंबरच्या दोन रुपये भाड्याच्या 'याटलस'सायकलवर नळीवर बसून बाप नावाच्या माणसाबरोबर जत्रा खेत्रा करण्याचे दिवस संपले. बाराणे तिकिटीत व्हीसीआरवर बच्चनचे सिनेमे पाहण्याचे दिवस संपले.


           तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले. चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या. चालून चालून चपला झीझवणारी हि शेवटचीच पिढी, आपल्या लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी. लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी. रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी. ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी. कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात  हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी.

         कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता. माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत. बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या.संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या. ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो. तुटलेल्या क्यासेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून  आमच्यातले काही इंजिनियर झाले. आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या. तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही. नाती नात्याला आणि मानसं माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.पैरे होते. इर्जिका होत्या. काही लागेबंध होते. त्यामागे भूमिका होत्या.


          गेल्या काही वर्षात गाव हरवलं. पहिली कुऱ्हाड गावाशेजारी खेटून असलेल्या बलदंड झाडांवर पडली. कारण घाताची सुरुवात अगोदर जे बोलू शकत नाहीत त्यांच्या मुळावर उठण्यापासून होते. आणि गावं भुंडी झाली. हळूहळू ऐसपैस घरांचे सिमेंटचे खुराडे झाले. माणूस मोकळी जागा दिसेल तेथे पाय रोवू लागला. अंगण आटले,मैदानं आकसली. गावाचा गरीब तोंडावळा बदलून माजुर्डेपणा वाढला. शेतीवरचं अवलंबन संपून घरोघरी नोकरदार आले.तुकडीकरण जमिनीचं झालं, तसंच माणसांचं. मानसामानसातल्या नात्याचं. या बक्कळ पैशाचं करायचं काय, हा प्रश्न नव्याने उभा राहिला.  पांढरीतून माती हद्दपार होवून डांबरी रस्ते आले. त्यावरून सुसाट दुचाक्या धावू लागल्या. आटोमोबायील तंत्रज्ञानाचा रानटी अविष्कार असलेल्या या दोनचारशे सीसी च्या रानटी गाड्या आणि त्यावर कानात बाळ्या अडकवलेली झीन्गुरटी पोरं. आणि त्यांच्या कानातले क्वाड. बाहेरच्या जगाशी असलेला संवाद बिल्कूल बंद झाला. नेट आलं. तंत्रज्ञान व्यसन झालं. चार पैसे देवून काही जीबी प्रेम आणि अनलिमिटेड माणुसकी मिळणारी जाहिरात उद्या येयील. तिथेही अशीच गर्दी राहील. कारण या कंपन्या एकदा विकलेला माल परत घेत नाहीत, आणि  वारंटी देवूनही माल खराब लागला म्हणून कुणी बदलायला माघारी येत नाहीत.


        गाव पार पार हरवलं. घरोघरी तंत्रज्ञान घुसलं. रिचार्ज वाढले talktime संपला. पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल एका एका अटटयाने कमी झाला. बघता बघता पिढी फोरजी झाली. प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली. जगणे मल्टीप्लेक्स झाले. चौका चौकात पुढार्यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले. गावाची पार पार रंडकी झाली. गावागावात मिनी महानगरं नांदू लागली. ग्रामपंचायतीच्या मेम्बर्शीपसाठी लोकं काठ्या कुऱ्हाडीनं भांडू लागली. चौदाव्या वित्तानं आणि सातव्या वेतनानं गावं केविलवाणी सुजली.


         कधी काळी हाच गाव हाकेसरशी धावून यायचा. कुणाला दुखलं खुपलं कि समद्या गावाचा जीव गोळा व्हायचा. वडिलधार्याच्या शब्दाला किंमत होती, धाक होता .बंधनं होती पण त्या बंधनातच गम्मत होती.


गेल्या काही वर्षात गाव बदलला. बदलता बदलता अनोळखी झाला. आता तर त्याचा थांगपत्ताच नाही. तो हरवला.
       आता तर तो हरवलाय म्हणून पेपरात जाहिरातही देता येत नाही. कारण हल्ली कळून चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गावपण. या गावाला चूड लावली म्हणून आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?  या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या. तो हरवतानाही आपण होतोच आसपास. दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं. पण ते तरी गावापासून वेगळे होतंच कुठं ?


       का असे तर नाही कि, या ग्लोबल विलेजच्या कृष्णविवरात गाव नावाची वस्तू गिळंकृत झाली ? गावपण नावाची कन्सेप्टच आऊटडेटेड झाली ?
=लेखक अनामिक आहे






आपली माणसं

Popular Posts